Articles 
कोल्हापूरच्या धुण्याची चावीची गोष्ट !

कोल्हापूरच्या धुण्याची चावीची गोष्ट !

कोल्हापूरच्या ‘धुण्याची चावीची गोष्ट

- म्हणून शाहू महाराज अजरामर आहेत.

(भवतालाच्या गोष्टी ०६)

 

कोल्हापूर... हे नाव घेतलं की आठवतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज. डोळ्यापुढं येते- अंबाबाई, रंकाळा, आखाड्यातली लाल माती, तांबडा-पांढरा तसेच, सामाजिक सुधारणांच्या खाणाखुणा असलेली अनेक ठिकाणं! पण याच्या पलीकडं तुम्ही कोल्हापूर बघितलंय का? बघितलं असेल तर मग सांगा, तिथं ‘धुण्याची चावी’ कुठंय?

रंकाळा ही कोल्हापूरची एक ओळख. सुंदर आणि विस्तीर्ण तलाव. या रंकाळ्याच्या बरोबरीनंच तिथं इतरही पाण्याच्या व्यवस्था अस्तित्वात आहेत. काही तर आजही वापरात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे- धुण्याची चावी! कपडे धुणे, अंघोळी, जनावरे डुंबणं यामुळे रंकाळ्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून केलेली ही खास व्यवस्था. याद्वारे रंकाळ्याचे पाणी दुसरीकडे नेले जाते. आणि तिथे त्याचा वापर या गोष्टींसाठी केला जातो. विशेष म्हणजे या व्यवस्थेमुळे पाणी दोनदा वापरणे शक्य झाले- एकदा अंघोळीसाठी / कपडे धुण्यासाठी आणि नंतर शेतीच्या वापरासाठी!

    

१३५ वर्षे जुनी व्यवस्था

‘धुण्याची चावी’ ही व्यवस्था १३५ वर्षांपेक्षा जुनी आहे. ती १८८३ साली अस्तित्वात आली. त्याच्या थोडं आधी म्हणजे १८३० च्या सुमारास कोल्हापुरात नळाने पाणी पुरवणे सुरू झाले. तटबंदीच्या आतमधला भाग उंचावर होता. तिथं पाणी चढेना म्हणून हौद बांधण्यात आले. त्यात पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर खालच्या उताराच्या बाजूला ही ‘धुण्याची चावी’ निर्माण करण्यात आली.     

 

या व्यवस्थेसाठी रंकाळा तलावाच्या खालून पाणी बाहेर काढण्यात आले. तिथून ‘धुण्याच्या चावी’कडे स्वयंचलित पद्धतीने पाणी जाते. ते जमिनीखाली टाकलेल्या पाईपमधून उताराने वाहते आणि चावीच्या ठिकाणी पोहोचते. चावीच्या ठिकाणी पाणी थांबवण्यासाठी व त्याचं नियंत्रण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ही धुण्याची चावी रंकाळा तलावापासून साधारणत: अर्धा-एक किलोमीटर अंतरावर आहे.

पाण्याचा वापर आणि पुनर्वापर

‘धुण्याच्या चावी’च्या इथे आणलेले पाणी तीन कारणांसाठी वापरले जाते-

१. तिथे कपडे धुण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी दगडी कट्टे आणि दगडीच कुंडं घडवली आहेत. एकूण १२० नळ जोड देण्यात आले आहेत. प्रत्येक नळाखाली पाणी साठवण्यासाठी एक दगडी कुंड आहे. आणि कपडे धुण्यासाठी दगडी चौथरासुद्धा.

२. अंघोळीसाठी ३८ मोऱ्या (स्नानगृहं) आहेत. त्या प्रत्येकात एक नळजोड देण्यात आला आहे.

३. जनावरांना पाणी पाजण्यासाठी किवा त्यांना धुण्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी लांबट, उथळ हौद तयार करण्यात आले आहेत.

 

या ठिकाणी पाणी अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी वापरले जाते. हे वापरलेले पाणी पुढे उतारानेच शेतीसाठी पाठवण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी २५ हजार ७४० रुपये खर्च आल्याची नोंद आहे.

 

कोल्हापुरात या धुण्याच्या चावीवर आजही कपडे धुण्यासाठी महिला जमलेल्या पाहायला मिळतात. काही पुरुष मंडळी अंघोळ करताना दिसतात. या ठिकाणचे दगडी चौथरे आणि गोल आकाराची कुंडं विशेष लक्ष वेधून घेतात. ही व्यवस्था पाहिली की कोल्हापूरबद्दल आणि विशेषत: शाहू महाराजांबद्दल आदर आणखी वाढतो. त्यांनी सामाजिक सुधारणांचा पाया रचण्याबरोबरच पाण्याच्या क्षेत्रात केलेले काम खूप मूलभूत आहे. राधानगरी धरणाची उभारणी असेल किंवा रंकाळा-धुण्याच्या चावी यासारख्या व्यवस्था... काही व्यक्ती इतिहासात अजरामर का होतात, याचीच ही काही उदाहरणे!

शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाच्या आणि कर्तृत्वाच्या एक पैलूची, त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त ही एक आठवण.

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील सहावी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

1 Comments

Sunil kaduskar

खूप छान माहिती

Your Comment

Required fields are marked *

You may also like