Articles 
बदललेल्या पावसाची कोकणाची गोष्ट!

बदललेल्या पावसाची कोकणाची गोष्ट!

बदललेल्या पावसाची कोकणाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ४४)

 

माउलीच्या दुग्धापरी

आले मृगाचे तुषार

भुकेजल्या तान्ह्यासम

तोंड पसरी शिवार

अशी एक कविता शालेय जीवनात होती. ती कविता तेव्हा पाठ करणं आणि परीक्षेत प्रश्न आलाच, तर उत्तर देण्यापलीकडे त्या कवितेचा अर्थ तितकासा समजला नव्हता. वास्तविक तो समजायला फारसं कठीण नव्हतं. कारण त्यामध्ये पहिल्या पावसाचं जे वर्णन केलं होतं, ते वर्षानुवर्षं प्रत्यक्ष अनुभवत होतो. ४५-५० वर्षांपूर्वीच्या अनुभवलेल्या त्या पावसाची सर आता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बदललेली ठिकाणं आणि खरोखरी अनेक पावसाळे पाहिल्यानंतर अनुभवात पडलेली भर किंवा आपले अनुभव किती तोकडे आहेत याची झालेली जाणीव झाल्यामुळेही कदाचित पावसाळा खूपच बदलला आहे, असं वाटत राहतं.

पावसाळ्याची तयारी

तशी  मृगाची चाहूल एप्रिल महिन्याच्या अखेरीला लागायची. शाळा आणि परीक्षा संपत आलेल्या असायच्या. त्यानंतर लहान-मोठ्या सर्वांचं एकच काम असायचं, ते म्हणजे पावसाळ्याची तयारी. घरांना तात्पुरत्या पडव्या बांधल्या जायच्या. त्यावर नारळाच्या झावळ्यांची म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संबोधनाप्रमाणे ‘चुडतांची शाकारणी’ केली जायची. नंतरच्या काळात कधीतरी या शाकारणीवर प्लास्टिकचा कागदही बांधाला जाऊ लागला. पण सुरुवातीच्या काळात तो नसायचा. ती चुडतं इतकी घट्ट बांधली जायची, त्यातूनच पाणी येण्याची शक्यताच नव्हती. बहुतेक सर्वच घरांच्या पडव्या याच पद्धतीने बांधल्या जायच्या. पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत घरात झगझगीत प्रकाश असायचा. पण पावसाळ्याची तयारी म्हणून या पद्धतीने पडव्या शाकारल्या गेल्या की पडवीतून आत गेल्याबरोबर लगेच एकदम काळोखच वाटायचा. कालपर्यंत जे घर थेट स्वच्छ प्रकाशाने उजळून गेलेलं असायचं, ते आता काळोखी वाटायचं. पण दोन दिवसांत त्याचीही सवय व्हायची. माझ्या आठवणीत सुरुवातीच्या काळात तर आमच्या घरात विजेचे दिवेही नव्हते. रात्र झाल्यानंतर रॉकेलचे कंदील आणि छोटे दिवे लावले जात असत. अनेक घरांना पडव्यांच्या भिंतीही चुडतांनी शाकारल्या जायच्या. रॉकेलचे दिवे घरात असताना या भिंतींना खूप जपावं लागायचं. पण या दिव्यांची झळ लागून आग लागल्याचं कधी ऐकलं नाही.

घरावर पूर्वीच्या पद्धतीची अर्धवर्तुळाकार कौलं असत. मंगलोरी कौलांची घरं ठराविक असायची. बहुतेकांच्या घरांची शाकारणी अर्धवर्तुळाकार कौलांनी म्हणजेच नळ्यांची केली जात असे. एप्रिल आणि मे महिना अशा तऱ्हेची शाकारणी करण्यातच जात असे. जुनी कौलं पुन्हा एकदा परतून घेतली जात. म्हणजे आधीची कौलं काढून स्वच्छ करून पुन्हा बसवली जात. घरोघरी हेच चित्र असायचं. अचानक पाऊस आला आणि उघडलेलं घर भिजून गेलं, असं कधी ऐकलं नाही.

 

पापड, कुरडया आणि मांडव

उन्हाळ्यात पापड, कुरडया वाढवल्या जात.. त्यासाठी घरासमोर मांडव घातले जात असत. त्या मांडवावर थेट सूर्यप्रकाशात वाळवणं केली जायची. ज्यांच्या सुपारीच्या बागा असायच्या ती मंडळी विशिष्ट पद्धतीने सुपारीची वरची साल काढून त्या सुपाऱ्या मांडवावर वाळत घालत. हे सर्व पाऊस येण्यापूर्वी म्हणजे साधारण मे महिन्याच्या मध्यापर्यंत होत असे. त्यानंतर घरासमोरचा मांडव काढला जात असे. नारळाच्या चुडतांचाच असलेला हा मांडव कोसळून पडव्या बांधण्यासाठी त्यातली चांगली चुडतं वापरली जायची.

अशी सारी तयारी झाली की प्रतीक्षा असायची ती प्रत्यक्ष पावसाची. माझ्या आठवणीत तरी पंचेचाळीस वर्षांपूर्वी मोसमी पाऊस सात जूनला अगदी मुहूर्त साधूनच यायचा. कधीही मागेपुढे व्हायचं नाही. उन्हाळ्यात म्हणजे होळी पौर्णिमेनंतर पावसाची एखादी सर येऊन जायची. त्याला वळवाची सर म्हणतात, हे तेव्हा माहीत नव्हतं, पण होळीच्या शेंड्यावर पाऊस पडतो, असं तेव्हा म्हटलं जायचं ते आठवतं.

भाजावळ आणि पहिल्या पावसाचा सुगंध

पहिला पाऊस वाजत-गाजत यायचा. ढगांचा प्रचंड गडगडाट व्हायचा. धुळीचे लोळ सर्वत्र पसरायचे. अनेक ठिकाणी भातशेतीची भाजावळ करण्याची पद्धत अजूनही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आहे. पाऊस पडायला आला की त्याचदरम्यान ही भाजावळ केली जात असे. तत्पूर्वी आपापल्या बागांमधून आंबा-काजूची वाळलेली पानं आणून शेतात पसरवून ठेवणं हासुद्धा एप्रिल महिन्यातला एक उद्योग असायचा. बहुतेक शेतकरी तो पार पाडत असत. शेतात पसरलेला हा पालापाचोळा प्रामुख्याने भाताची पेरणी करायच्या शेतामध्ये पसरला जात असे. पाऊस जवळ आल्यानंतर आणि नेहमीच्या कामाच्या गडबडीमुळे भाजवळ करायची राहून गेली, तर ती अगदी मृग नक्षत्राच्या म्हणजे ७ जूनच्या मुहूर्तावरच केली जायची. त्यात कोणता हेतू होता हे माहीत नाही. पण संपूर्ण शेतातली भाजावळ जळून गेल्यानंतर त्यावर लगेच पाऊस पडला, तर ती राख वाहून जात नसेल, त्या शेतातच पसरत असेल. पहिला पाऊस कितीही मोठा असला तरी भातशेतीच्या खाचरांमधून पाणी वाहून जाण्याएवढा तो नक्कीच मोठा पडत नसायचा. त्यामुळे भाजावळीनंतर राहिलेली राख शेतात पसरायची. भाजावळ अयोग्य असल्याचं सांगितलं जात आहे. पण पावसापूर्वीचीच भाजावळीची परंपरा कोकणात आजही जपली जाते. या भाजावळीचा आणि पहिल्या पावसामुळे मातीचा विशिष्ट सुगंध आसमंतात भरून राहत असे. मोसमी म्हणजे मिरगाचा म्हणजे मृगाचा पाऊस आल्याचं सांगत तो सुगंध पहिले काही दिवस दरवळत राहत असे.

पहिला पाऊस पडताच...

पहिला पाऊस पडला की लगेच दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या शेतात नांगरणी सुरू व्हायची. कोरडं भात म्हणजे तांदळाचं बियाणं पेरण्यासाठी नांगरणी केली जायची. ठराविक दिवसांत ते रुजून यायचं. मृग नक्षत्राचा मुहूर्त हुकला तर काही शेतकरी भाताचं रोव पेरत असत. रोव म्हणजे पेरायचं भात काही काळ भिजवून ठेवून त्यावर गरम पाणी घातलं जायचं. या भाताला छोटेसे कोंभ येत असत. नंतर ते बियाणं पेरलं जायचं. पावसानंतरचे पहिले पंधरा दिवस भातपेरणीचे असायचे. काही शेतांमध्ये अंगची ओल असायची. म्हणजे ही शेतं काही प्रमाणात अगदी उन्हाळ्यातही ओली असायची. अशी शेती असलेल्या भागाला शेळ म्हणायचे. अशी अंगची ओल ज्यांच्या शेतात आहे, असे शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांतच पेरणी करून ठेवायचे. त्यामुळे पहिला पाऊस आल्यानंतर लगेच काही दिवसांत तरवा काढणं शक्य होत असे. तरवा म्हणजे भाताची एक फुटापर्यंतची रोपं. अशा दहा-बारा रोपांचा एक आवा नांगरलेल्या शेतात लावला जात असे. त्यालाच लावणी म्हणतात. साधारणपणे संपूर्ण जून महिना आणि जुलैचे पंधरा दिवस शेतीच्या या कामांची लगबग असायची.

 

मेरा आणि घोंगडी-इरली

शेतीची काम करताना त्यात पुरुष आणि बायका यांची कामं ठरलेली असायची. तरवा काढणं, लावणी करणं हे काम प्रामुख्याने बायका करत असत, तर शेताची नांगरणी करणं, मेरा म्हणजे शेताच्या दोन तुकड्यांच्या मधला बांध शेतातल्या चिखलानं व्यवस्थित बांधणं, बांधाच्या शेजारी नांगरणं शक्य नसल्यानं या मेरांच्या जवळचा भाग कुदळी आणि टिकावांनी खणून नांगरणी झालेल्या शेतासारखा चिखल तयार करणं ही कामं पुरुष करत असत. पावसापासून संरक्षणासाठी पुरुष मंडळी कांबळी म्हणजे घोंगडी घेत. बायका विशिष्ट पद्धतीनं कुड्याच्या पानांपासून तयार केलेली इरली आपल्या डोक्यावर घेत असत. शेतात किती इरली हलताना दिसत आहेत, त्यावरून किती बायका काम करत आहेत, याची मोजणी करणं शक्य व्हायचं. भाताची लावणी केल्यानंतर  तीन ते चार महिन्यांमध्ये ते कापणी योग्य होत असे. ज्यांची पेरणी आणि लावणी लवकर झाली असेल, अशा शेतकऱ्यांची शेतं गणेशोत्सवाच्या नंतर लगेच कापणीला यायची.

शेतीभातीबरोबरच शाळेची तयारीही सुरू असायची. तेव्हा लाकडी दांड्याच्या छत्र्या असायच्या. भर पावसात काहीवेळा त्या पटकन उघडायच्या नाहीत. दांडा लाकडी असल्यामुळे तो फुगीर होत असे. त्यामुळे छत्री पटकन उघडायची नाही. काही वेळेला उघडलेली छत्री पाऊस गेल्यामुळे बंद करताना बंद करण्याचा चाप दाबल्यानंतर छत्री पटकन मिटायची आणि त्यात हात सापडायचा. मग तो बरेच दिवस दुखत राहत असे. नंतर माझ्या आठवणीतच लाकडी दांड्याच्या छत्र्या बाजारात येणं बंद झालं. छत्र्य वाऱ्या-वादळात उलटी होणं हाही प्रकार अनुभवला. उलटी झालेली छत्री पुन्हा व्यवस्थित करताना त्यातल्या तारा मोडायच्या आणि संपूर्ण छत्रीच दुरुस्त करायला द्यावी लागायची. पण हा प्रकार तितका वारंवार होत नसे. कारण पावसाळ्यात वाऱ्याचं प्रमाणही तसं तुलनेने कमी असायचं.

श्रावणमासी हर्ष मानसी...

पावसाळ्यात येणारा श्रावण महिनाही लक्षात राहत असे सोमवार आणि शनिवार हे दोन दिवस शाळा अर्धा दिवस असे. श्रावण महिना सणांनी भरलेला असायचा. तेव्हा वेगवेगळ्या व्रतांसाठी पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पान काढली जात असत. श्रावणात पावसाचं प्रमाण कमी असायचं. श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता तेव्हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळायची. अधूनमधून पावसाची मोठी सर यायची, पण पाऊस कमी झाला, मोठी सर येऊन गेली की पत्री काढायचं काम केलं जायचं. त्यात एक वेगळाच आनंद असायचा.

पावसाळ्यातच येणाऱ्या गणेशोत्सवात मोठी धांदल उडायची. पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालेलं असायचं. पण एखाददुसरी मोठी सर यायची. अनेकवेळा दोन पावसांच्या मध्ये म्हणजे दोन मोठ्या सरींच्या मध्ये बिनपावसाचा वेळ असेल, तेवढ्या वेळातच मूर्तिशाळांमधून गणेशमूर्ती आपापल्या घरच्या गणेशमूर्ती घरी घेऊन निघायची लगबग असे. या काळात भातशेती चार ते पाच फुटांपर्यंत उंच वाढलेली असे. शेतामधल्या मेरांवरून म्हणजे बांधावरून मळलेल्या वाटेने घरोघरचे गणपती डोक्यावरून आणले जात असत. खोळ म्हणजे प्लास्टिकचा कागद प्रत्येक गणपतीच्या मूर्तीवर घातला जात असे. दूरवरून पाहताना अनेक गणपती एका रांगेने निघाले आहेत, असं दृश्य दिसत असे.

 

 

कालावधी ठरलेला

जून ते सप्टेंबर महिन्यातला पावसाळ्याचा मुख्य कालावधी. यात सहसा बदल तेव्हा तरी होत नव्हता. जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीला पाऊस येत असे. अधून मधून पाऊस  पडत असे. सप्टेंबरच्या अखेरीला पाऊस विश्रांती घेत असे. त्यामुळे कापणी केलेल्या भात वाळवण्यासाठी शेतीमध्ये पसरलं जात असे. क्वचित काहीवेळा दुपारनंतर आभाळ दाटून येत असे आणि एखादी मोठी सर पडून जात असे. याचा अंदाज शेतकऱ्यांना येत असेच. घाईघाईने कापलेलं पीक गोळा करून ते झोडणीच्या ठिकाणी म्हणजे प्रामुख्याने मांगरात हलविलं जात असे. पाऊस येण्याचा अंदाज शेतकऱ्यांना नेमका कसा येत असे, ते मात्र समजत नसे. पावसाचं वेळापत्रक हे असं अगदी ठरलेलं असायचं. त्यात सहसा बदल झाल्याचं आठवत नाही. नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीचा तेव्हा तरी प्रत्यही प्रत्यय येत असे.

बदलाला सुरुवात

साधारण १९८३ सालचा कोकणातल्या पावसाचा एक अनुभव आहे. कोकणात अतिवृष्टी झाली होती. मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला होता. अतिवृष्टीमुळे रस्ते तुटले होते. वादळामुळे रस्त्यावर झाडं मोडून पडली होती. महामार्ग आठ दिवस बंद होता, असं आठवतं. माझ्या आठवणीतला पावसाचा मोठा उत्पात होता तो. त्यापूर्वी मी कधी अनुभवला नव्हता.

मध्ये बराच काळ मुंबईत होतो. तेथून १९९५ मध्ये रत्नागिरीत आलो. मुंबई ते रत्नागिरी हा प्रवासही भर पावसात १५ जूनला झाला. तो दिवस आजही आठवतो. मुंबईहून निघताना पाऊस नव्हता. पण पेणच्या पुढे पाऊस चालू झाला. नंतर त्याने आणखी उग्र रूप धारण केलं. तेव्हाचा महामार्ग तसा अरुंद होता. सामान भरलेला आमचा टेम्पो कशेडी घाटात आला. रस्त्यावरून पाणी वाहत होतं. त्यातून टेम्पो सरकत असल्याचं दोन-तीन वेळा जाणवलं. पाऊस कमी व्हायचं नाव घेत नव्हता. आठ तासांच्या प्रवासासाठी तेव्हा बारा तास लागले. जीव मुठीत घेऊन प्रवास केला होता. एवढे तास सतत पाऊस त्यापूर्वी कधी अनुभवला नव्हता.

बदललेलं वेळापत्रक

रत्नागिरीत आल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत मात्र पावसाचा सगळं वेळापत्रकच बदलल्याचं जाणवलं. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पाऊस संपताना विजांचा प्रचंड कडकडाट होत असे. वीज पडल्याचा प्रकार कधीतरी घडत असे. रत्नागिरीत आल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी वीज पडण्याचं रौद्र रूप अनुभवलं. जून महिन्याच्या सुरुवातीला आठ-दहा दिवस दररोज वीज पडत असे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवाचे दहा दिवस सलग पाऊस पडत होता. संध्याकाळी पाऊस पडायचा पण विजांचा प्रचंड कडकडाट व्हायचा. दहा दिवस असं होत होतं. नवरात्रोत्सव संपल्यानंतर विजांचं तांडव थांबलं. पाऊसही कमी झाला. सप्टेंबर महिन्याची मर्यादा ओलांडून ऑक्टोबरच्या मध्यानंतरही पाऊस पडत होता.

तिथपासून पुढे पावसाळा भीतिदायक वाटू लागला. विशेष म्हणजे चार महिनेच पाऊस पडण्याचे दिवस संपले, असं आता जाणवू लागलं आहे. एखाद्-दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळला तर दर महिन्यात पाऊस पडतो आहे. त्या जोडीनं चक्रीवादळंही आता होऊ लागली आहेत. यापूर्वीचं मोठं चक्रीवादळ माझ्या अगदी लहानपणी होऊन गेलं होतं. तेव्हा वादळ म्हणजे काय, हे समजत नव्हतं. पण नारळी आणि पोफळीचीच्या झाडांनी सर्वत्र माना टाकल्या होत्या. तेव्हा मी कुडाळ तालुक्यात वालावल या माझ्या आजोळच्या गावी होतो. ते घर रानात होतं. वादळामुळे प्रामुख्याने पोफळीची झाडं भुईसपाट झाली होती. नकळत्या वयात वादळाचं गांभीर्य माहीत नव्हतंच. कोसळलेल्या पोफळीवरून घसरगुंडीचा आनंद घेतला, पण तो किती धोकादायक होत आहे, तेव्हा समजलंच नव्हतं. पोफळीचं दुसरं टोक जिथे संपत होतं, तिथून पुढे मोठी दरीच होती. त्यानंतर चक्रीवादळाचा अनुभव रत्नागिरीत २००९ मध्ये झालेल्या फियान वादळाच्या वेळी काही प्रमाणात घेतला. आता इथून पुढच्या काळात तर अरबी समुद्रात वारंवार वादळं होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस आणि वादळाचं वेळापत्रकच बदलून गेल्याचं आता निश्चित झालं आहे.

 

तेव्हा आकाशवाणी हेच त्यातल्या त्यात लवकर माहिती मिळणारं प्रसारमाध्यम होतं. तेव्हाच्या आकाशवाणीवरच्या दोन वेळच्या बातम्यांमध्ये हवामानाचा अंदाज सांगितला जात असे. मात्र तो कुणी गांभीर्यानं घेत नसे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशा स्वरूपाचा तो अंदाज असे. आताच्या एवढा अचूक अंदाज वर्तविण्याची तेव्हा सोय नव्हती. शिवाय पाऊसही तसा नियमित पडत होता. आताच्या इतका तो अनियमित नव्हता. ठरलेले चार महिनेच पाऊस पडत असे. अंदाज वर्तविणारी व्यवस्था नव्हती, तेव्हा पाऊस नियमित होता. आता मान्सूनची आणि वादळाचीही मिनिटामिनिटाची स्थिती अचूकपणे सांगितली जाते, जाऊ शकते. काही प्रमाणात सावधगिरी बाळगता येते, पण अनेक बाबतीत माणसाचे प्रयत्न अपुरे ठरतात. तजवीज करता येत नाही. पूर्वी अंदाज नव्हता, पण अंदाजाने विविध व्यवस्था करता येऊ शकत असत. अज्ञानात आनंद होता का, असंही वाटून जातं.

माणूसही बदलला

पावसाबरोबरच अनेक बाबतीत कोकणातील माणसांनी बदल घडवून आणले. नारळाच्या झावळांचे म्हणजेच चुडतांचे मांडव आता घातले जात नाहीत. त्याऐवजी पत्र्यांचे मांडव दिसतात सुकवणं, वाळवणं त्यावरच केली जातात. मांडवासाठी पोफळीचे खांब वापरले जात. आता लोखंडी खांबांनी मांडव शाकारला जातो. तो कायमस्वरूपी असतो. पावसात तो कोसळण्याची शक्यता नसते. नेहमीच येणाऱ्या वाऱ्यावादळात टिकून राहण्यासाठी ते मजबूत बनवले जातात. घरांवरची अर्धवर्तुळाकार कौलं म्हणजे नळे इतिहासजमा झाले आहेत. स्थानिक कुंभार आता तशी कौलं बनवत नाहीत. त्याऐवजी त्यांनी विटांचा व्यवसाय सुरू केला आहे. कारण आता कुडाच्या भिंती जाऊन अनेक घरांच्या भिंती सिमेटच्या बांधल्या जाऊ लागल्या आहेत. आता घरांच्या शाकारणीसाठी काही ठिकाणी मंगलोरी कौलं वापरली जातात, तर अनेक ठिकाणी सिमेंट आणि गॅल्व्हनाइज्ड पत्रेच वापरले जातात. कौलांच्या घरात गळती होत असे. ती नारळाच्या झावळाच्या पानांनी तात्पुरती बंद केली जात असे. पावसाळाभर ही दुरुस्ती टिकत असे. आता पावसाचं आणि वाऱ्यावादळांचं प्रमाण इतकं वाढलं आहे, ही तात्पुरती दुरुस्ती टिकत नाही. त्यावर मंगलोरी कौलं आणि पत्रे हाच उपाय योजला जातो. दरवर्षी घर परतणं (कौलांची साफसफाई) आणि त्यातही बदललेल्या पावसाच्या स्वरूपामुळे हा बदल करावा लागला असण्याची शक्यता आहे.

आता जवळजवळ बारमाही पाऊस असतो. विजांचा कडकडाट तर कधीही ऐकू येऊ लागला आहे. उन्हाने सुकलेल्या मातीवर पाऊस पडला की मातीचा दरवळ अलीकडे केव्हाही येऊ लागतो किंबहुना आता त्या सुगंधाचं अप्रूपच राहिलेलं नाही. शेतीच्या कामांचं आता काही प्रमाणात यांत्रिकीकरण झालं आहे. बैल सांभाळणं खर्चीक झालं आहे. त्याऐवजी तास-दोन तासांसाठी भाड्यानं पॉवर टिलरनं नांगरणी केली जाते. तरवा काढणं आणि लावणीची कामं मात्र अजूनही माणसंच करतात. पण पावसापासून संरक्षणासाठी वापरली जाणारी घोंगडी आणि इरल्यांची जागा मध्यंतरी प्लास्टिकच्या खोळीनं घेतली होती. आता शेतात रेनकोट दिसतात.

निसर्गाचं चक्र बदलल्याचं पदोपदी जाणवतं. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीवर मात करण्यासाठी माणसांनीही अनेक बदल केले आहेत. बदललेल्या निसर्गाचं प्रतिबिंब त्यात दिसतं. केवळ ४५-५० वर्षांतले विशेषतः पावसाळ्यातले कोकणात अनुभवलेले हे बदल आहेत. यापुढेही त्यात आणखी बदल होत जाणार आहेत. कारण बदल हे निसर्गाचा आणि अपरिहार्यपणे माणसाचाही स्थायीभाव आहे.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४४ वी गोष्ट.)

 

- प्रमोद कोनकर, रत्नागिरी

[email protected]

(भवताल मासिकाच्या जून २०२१ अंकातून...)

 

फोटो सौजन्य =

1. Wikimedia.org

2. Pixahive.com

3. Ganesh Kore

4. Arya Joshi, Wikimedia.org

5. Sandip Dey, Wikimedia.org

 

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४४ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

4 Comments

सौ. मेधा हेमंत राज्यगोर

भवतालच्या सा-या गोष्टी रोमहर्षक असतात. अनुभवलेल्या गोष्टी शब्दांत मांडणं ही एक कला आहे आणि याचा प्रत्यय या गोष्टीतूनही आला. माझ्या लहानपणाची आठवण झाली. लेखकाला धन्यवाद !!!

Bhavatal Reply

होय, बदलत्या पावसाचे वर्णन अतिशय उत्तमप्रकारे केले आहे. भवतालच्या गोष्टी आपल्या संपर्कात शेअर करत राहा. मनापासून आभार.

Abhaykumar Lalwani

रोज भवतालच्या गोष्टीचे टिझर आणि लिंक गेले महिना - दिड महिना माझा एक भाऊ सातत्याने पाठवतो आहे.लेकीच्या लग्नची आणि नंतर व्यवसायात सिझनची लगबग असल्याने मी एकही गोष्ट वाचली नाही. पण विषय खूपच छान आहेत. नंतर आवर्जून वाचायचा संकल्प रोज करत होतो. आजची गोष्ट मात्र वाचली. कोकणची जिवनशैलीच उभी केली आहे. तसा गोव्याला जाण्या पलीकडे कोकणाचा माझा फारसा संबंध नाही. पण कोकणाची एक अनामिक ओढ मात्र नक्कीच आहे. लेख वाचताना खास स्थानिक अनेक शब्द वाचायला मिळाले. निसर्गचक्रातील हा गुढ बदल चिंताजनक वाटतो.

Bhavatal Reply

सर, धन्यवाद. लोकांची वेगळा कंटेन्ट वाचायला मिळावा आणि त्यांची या विषयांमध्ये रूची वाढावी म्हणून हा प्रयत्न आहे. आपणही आपल्या संपर्कात शेअर करावे, ही विनंती.

Sandip Bhuyekar

खूप छान. मुंबई - गोवा महामार्ग रुंदीकरण झाल्याने जंगलाचा एक मोठा पट्टा कायमस्वरूपी नष्ट झाला. प्रवास सुकर होईल कदाचित पण झाडीतून जायची मजाच संपली....

Bhavatal Reply

होय, बदलांचे हे बरे - वाईट परिणाम. धन्यवाद.

Ashwini Dongre

खूप सुंदर वर्णन ! माझे मूळ कोकणातलेच त्यामुळे लेखात नोंदवलेले बदल अगदी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. भवतालचे लेख माहितीपूर्ण आणि रंजक असतात. धन्यवाद !

Bhavatal Reply

तुम्ही अनुभवलेल्या बदलांची पुन्हा आठवण व्हावी. यावरून या लेखामुळे महत्त्व स्पष्ट होते. आपल्या संपर्कात शेअर करत राहा. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like