Articles 
महानगरी मुंबईच्या बदलत्या पावसाची गोष्ट !

महानगरी मुंबईच्या बदलत्या पावसाची गोष्ट !

महानगरी मुंबईच्या 'बदलत्या' पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४३)

 

मुंबईचा पाऊस आजपर्यंत कधीच भरवशाचा नव्हता. तो नेहमीच अनिश्चिततेचे ढग घेऊन बरसला आहे. कधी धो - धो, तर कधी वीस - बावीस दिवस गुडुप. काळजी वाटावी, अशा कालकुपीत दडी मारणारा. थोडक्यात सर्वसामान्य मुंबईकर दररोज सकाळी उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडला की, संध्याकाळी तो घरी वेळेवर परतेल का, याची जशी शाश्वती नाही, तसेच या मुंबईच्या पावसाळी मोसमाचे आहे. गेली शेकडो वर्षे तो लाखो आणि अलीकडच्या काळात कोट्यवधी मुंबईकरांना वेधशाळेच्या अंदाजांप्रमाणेच चकवत आला आहे !

मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी आणि मुंबईचे दादर-माहिमपासूनचे किनारे चौपाटी म्हणून मिरवले जाण्यापर्यंत शाबूत असताना पाऊस मुंबईला कधी झोडपत आला आहे, तर कधी अपवादात्मक वर्षी श्रावणसरींसारखा हलकाच प्रसाद वाटून, यंदा एवढ्यावरच समाधान मानून घ्या, असं सांगून निघूनही गेला आहे.

तेव्हाही मुंबई जलमय होत होती

प्रगत तंत्रज्ञानाच्या झंझावातात आपण आज काळाचे घड्याळ सहज उलट फिरवून पाहू शकतो. १९३२ सालच्या म्हणजे ९० वर्षांपूर्वीच्या मुंबईतल्या पाऊसप्रपाताचे ध्वनिचित्रमुद्रण कुण्या द्रष्टया ब्रिटीश संस्थेने करून ठेवले होते. ती फित आज आपण मोबाईलवर सहज पाहू शकतो. लाखो जणांपर्यंत सहज पुढेही पाठवू शकतो. एका अर्थाने सुमारे ९० वर्षांपूर्वीचा मुंबईचा पाऊसच या फितीद्वारे प्रेक्षकांना भिजवत जातो. घनघोर पावसामुळे बंद पडलेल्या त्या काळातल्या मोटारगाडीला एक बैलगाडी दोर बांधून खेचत घेऊन चालली आहे, या दृश्याने ही फीत प्रेक्षकांना विस्मयचकित करून टाकते. आणखी एक जाणीव ही फीत करून देते की, जसा अधिक काळ पडलेला संततधार पाऊस आज कोट्यवधी लोकसंख्येच्या मुंबईला खिळवून ठेवू शकतो, अगदी तशीच स्थिती शंभर वर्षांपूर्वीही होती... मुंबई चाळी-चाळींची अशी आडवी असतानाही अतिवृष्टी झाली की, मुंबई जलमय होत होती !

केरळच्या किनाऱ्यांवर दाखल होणारा मान्सून पुढच्या सात दिवसांत म्हणजे ७ जूनच्या आसपास मुंबईचे आभाळ काबीज करणार, ही गेल्या अनेक वर्षांची म्हणजे सुमारे शंभर वर्षांची प्रथा वा परंपरा ! या पावसाची चाहूल लागली रे लागली की, एप्रिलअखेरपासून मुंबईच्या काळजात धडधड सुरु व्हायची आणि चाळीचाळींवरची मंगळुरी कौले बदलण्यासाठीचे गडी सज्ज व्हायचे.

पावसाची तयारी, तेव्हाची!

लालबाग, परळ, काळाचौकी, शिवडी, चिंचपोकळी अशा गिरणगावातील हजारो चाकरमानी कुटुंबाची स्वप्ने या चाळींत फुलत असायची आणि पावसाळ्याआधी आपल्या या घरकुलांना शाकारलं गेलं पाहिजे ही जबाबदारी जणू सामूहिकरित्या पाहिली आणि पाळली जायची. त्या तुलनेत मुंबई सेन्ट्रल, ग्रँट रोड, गिरगाव ते कुलाब्यापर्यंतची वस्ती धनिक, मध्यमवर्गीय आणि श्रमिक अशी मिश्रस्वरुपाची होती. आणि मध्यमवर्गीयांच्या चाळींबरोबर स्वतंत्र टेरेस असलेल्या आधुनिक रुपाच्या चार मजली इमारतीही समुद्रकिनाऱ्यालगत उभ्या राहिल्या होत्या. मरिन ड्राइव्ह ते कुलाब्यापर्यंतच्या या इमारतींवर बांबुंचे मांडव घालून ताडपत्रीची शाकारणी केली जायची.. कालांतराने सोयीचे आणि स्वस्त म्हणून डांबर हा पर्याय छप्पर आणि भिंतींवरचे तडे शोधून पावसामुळे होणारी गळती रोखू लागला. त्यामुळे नाक्यानाक्यावरच्या इमारतींखाली डांबर उकळवायला ठेवलेली पिंपे आणि त्याखाली पेटत्या लाकडांचा जाळ दिसू लागला की, मुंबईकरांच्या मनात ‘घन घन माला नभी दाटल्या.. कोसळती धारा’ ही पावसाची नांदी  घुमायला सुरुवात व्हायची. पावसाची पावले वाजण्याआधीच हा असा झपाट्याचा बदल मुंबईचा नवा मेकअप करायला सुरुवात करायचा.

छत्री... धनिकांची मिरास!

या पावसाने मुंबईच्या धावपळीच्या जीवनात काय काय बदल घडवून आणले याची जंत्री द्यायची तरी किती? एका साध्या छत्रीचे उदाहरण पुरेसे आहे. एकेकाळी छत्री ही सर्वसामान्यांना परवडणारी वस्तू नव्हती. धनिक वर्गाची ती मिरास होती. गिरणगावापासून ते सर्वत्र श्रमिकांच्या वस्त्यांत पावसाचा मारा हा प्लास्टिकच्या टोप्या, पिशव्या आणि अगदी फार फार तर रेनकोटद्वारे झेलला आणि परतवला जायचा.. हा रेनकोट ज्याकडे असायचा तो कामगार आपला रेनकोट कशोशीने जपायचा.. हमाल आणि तत्सम कष्टकरी वर्गाची तेवढीही ऐपत नसायची. डोक्यावरची टोपली, हारा किंवा अंगावरचा रुमाल वा टॉवेल त्यांचं अंग शक्य तेवढं ओलं होऊ द्यायचा नाही. रुमाल किंवा टॉवेल डोक्यावर गोल चुंबळ करून घेऊन माथं भिजू द्यायचं नाही यासाठी त्यांची काही क्षण कसरत व्हायची. दुसरा सोपा पर्याय म्हणजे दुकानांच्या दीड बाय दोन फुटांच्या छोट्या छपराखाली घडीभर थांबायचं. मुंबईच्या गोदीतून, गिरण्यांतून कष्टणाऱ्या कामगारांना, रस्त्यावर भाजी वा अन्य चीजवस्तू विकणाऱ्या या श्रमिकांना पाऊस... मी आलोय.. गड्या दम घे जरा, असे सांगत जणू  हक्काची विश्रांती द्यायचा. आणि या क्षणभर विश्रांतीचा कळस म्हणजे तांबूस गरमागरम घोटभर चहा! जवळ कुठे हिंदू विलास चहाचे दुकान वा टपरी असली तर तडतडणारा पाऊस आणि कपाळावर छोटे गंध लावलेल्या राजस्थानी चहावाल्याच्या मोठ्याशा भगुल्यातला चविष्ट चहा श्रमिकांचे तोवरचे सारे कष्ट क्षणार्घात दूर करून टाकायचा !

पाणी तुंबायचं, पण लगेच ओसरायचं!

मुंबईचा पाऊस जेव्हा घनघोर पडायचा तेव्हा गिरगाव, परळ, हिंदमाता किंग्जसर्कल, शीव अशा काही ठराविक सखल भागांची तळी करून टाकत स्थानिक लोकांची, वाहतुकीची आणि ते सांभाळणाऱ्या पोलिसांची परीक्षा घ्यायचा. भौगोलिक आणि भरती-ओहोटीच्या नैसर्गिक कारणांमुळे मुंबई तेव्हाही आजच्यासारखीच तुंबायची, फक्त वेळेची तुलना करता पाणी लगेच ओसरायचे. ते बराच काळ तुंबून राहून मुंबईचा खोळंबा करायचे नाही. पण गेल्या पंचवीस वर्षांत हिरव्यागार मैदानी पट्टयांचे घास बिल्डरांनी गिळंकृत केले आणि ही खोळंब्याची स्थिती जीवघेणी होत गेली. या आधीचा पाऊस कितीही मुसळधार पडला तरी ते पाणी मोकळ्या जमिनींवर रिचायचं. मिठी नदीपासून ते दहिसर नदीपर्यंतच्या पात्रांचे गळे तेव्हा आवळण्यात आले नव्हते.

बोटींचं विलोभनीय दर्शन

विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या मुंबापुरीचा आद्य नागरिक तो आगरी कोळी. मच्छिमार समाज. मासेमारीवरच ज्याचे सारे जीवन अवलंबून त्या कोळी समाजाची पावसाआधीची लगबग मोठी असायची. खोल समुद्रात जाणाऱ्या बोटींना हळूहळू किनारपट्टीजवळ आणलं जायचं आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बहुतेक कोळीवाड्यांजवळ एका विशिष्ट जागी या बोटी उभ्या करून ठेवल्या जायच्या. एरव्ही कधी फारशा न दिसणाऱ्या या बोटी आईवडिलांचं बोट धरून शाळेत पहिल्यांदाच जात असलेल्या इवल्याइवल्या डोळ्यांचं मोठं आकर्षण असायचं. विशेषतः माहीम-वांद्रे दरम्यानच्या माहीम किल्ला कोळीवाड्याजवळून जाताना या विविध रंगांचे झेंडे आणि नावं मिरवणाऱ्या बोटींचं विलोभनीय दर्शन व्हायचं. नवा गणवेश, त्यावर खबरदारी म्हणून चिमुकला रेनकोट आणि त्याआड पाठीवर दडलेलं छोटंसं खाऊचं दप्तर, अशी दृश्ये पाऊसकाळात मुंबईत हटकून दिसायची. तसंच रस्त्याच्या उतरत्या कडेला येऊन कागदी नावा पाऊसपाण्याच्या प्रवाहात सोडून त्या गटारावरील पट्टीपट्टीच्या झाकणातून अचानक वेगाने गुडुप होईपर्यंत पाहात राहणे हा बच्चेकंपनीचा एक हमखास खेळ असायचा.. ही जागोजागची दृश्ये आता मुंबईत दुर्मिळ झाली आहेत.

रोमँटिक केलेला पावसाळा

पन्नास - साठ वर्षांपूर्वीचा मुंबईतला पावसाळा अधिक रोमँटिक केला होता तो हिंदी चित्रपटांच्या लाटेने.  एका बाजूला आभाळात कृष्णधवल ढगांची सरमिसळ तर दुसऱ्या बाजूला राजकपूरचा हिट झालेला श्री - ४२० हा कृष्णधवल चित्रपट. ६७ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटात ‘प्यार हुआ.. इकरार हुआ..’ हे गाणं म्हणत राजकपूरने नर्गिसच्या साथीने हा मीलनऋतू अजरामर करून टाकला. एका छत्रीत दोन जीवांचे घट्ट बिलगून जाणे, ही प्रेमाची नवी भाषा या चित्रपटाने लाखो रसिकांना विशेषतः मुंबईकरांना शिकवली. तेव्हापासून पुढे सुमारे अनेक वर्षे मुंबईतल्या चित्रपटगृहांनी पावसाळ्यात रिकाम्या खुर्च्या अनुभवल्या नाहीत. खास हिंदी चित्रपटांचा रसिक या सिनेमागृहांकडे जसा मोठ्या संख्येने वळायचा तसेच शाळा, कॉलेजचे वर्ग बुडवून विद्यार्थी आणि प्रेमप्रकरणंही मॅटिनीपासून पुढच्या दोन खेळांना दिसायची. पावसाळा, छत्री आणि बिलगलेलं प्रेम अशी एक अनोखी त्रिमिती मुंबईने जन्माला घातली. किंबहुना पाऊस आणि उधाणलेला समुद्र पाहात समुद्रकिनारी छत्रीत बिलगून बसलेली युगुले या क्षितीजचित्रांची निर्मिती तेव्हापासूनच झाली !

पाऊस आणि मानव हे जसं अनोन्य नातं आहे तसंच एक शहर म्हणून मुंबई आणि पाऊस यांचा बंध अतूट आहे. एकेकाळी काही लाखांत आणि आज करोडोंच्या घरात असलेल्या मुंबईच्या अफाट लोकसंख्येचा जनक केवळ या शहरातल्या नोकरीच्या संधी आणि सुखसुविधा नाहीत. या शहराच्या वाढीला मूळ आधार आहे तो पावसाचाच. या शहराच्या छत्राखाली अनेक धर्मीय आणि जात, संस्कृती गेली शेकडो वर्षे एकत्र नांदत आल्या आणि बहरत गेल्या, त्या केवळ मुंबईतील मुबलक पाणीपुरवठ्याच्या भक्कम साथीने. या शहराच्या आसपासच्या तत्कालीन खेड्यांतून धरणं, तलाव बांधून ते पाणी जलवाहिन्यांमार्गे  येथे आणले गेले आणि हे शहर विस्तारत गेले. त्यामुळे या शहराच्या धरण, तलावक्षेत्रांत दरवर्षी पुरेसा पाऊस होणे हा या शहराच्या जीवनमरणाचा प्रश्न ठरतो. दरवर्षीच्या पावसाचे गणित काही टक्क्यांनी जरी चुकले तरी शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. याच पावसाच्या पर्यायाने पाण्याच्या जोरावर मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात मिरवते.. याच पाण्याच्या उपलब्धतेमुळे देशभरातून दररोज या शहरावर अनिर्बंध असे बेरोजगारांचे लोंढे नव्या संसाराची स्वप्ने घेऊन आदळत राहतात आणि शहराच्या नियोजन व्यवस्थेपुढे नवे प्रश्न उभे करतात...

काही धक्कादायक बदल

मी जो मुंबईचा पाऊस गेली साठ वर्षे पाहिला त्यातील काही बदल धक्कादायक आहेत. मुंबईत वीज पडून माणसं दगावण्याच्या घटना मी पंचेचाळीस वर्षांचा होईपर्यंत ऐकल्या नव्हत्या. त्या मुंबईत प्रत्यक्ष घडल्या. आज मुंबईत थोडा अधिक पाऊस झाला तरी लोकलपासून सारे काही ठप्प होऊन मुंबईच काही काळ थांबते. तिला उसंत घ्यावीच लागते. बदलत्या हवामानामुळे आता विनाशकारी निसर्गचक्राचे तडाखे मुंबईलाही बसायला लागले आहेत.. कोकणापासून मुंबईपर्यंत समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांना झोपडून काढणारी चक्रीवादळे आता भविष्यकाळात अपवादात्मक नसतील, ती अमेरिकेच्या काही प्रांताप्रमाणे नित्याची होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे २०५० सालापर्यंत जगातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या ५५० शहरांचे काही भूभाग पाण्याखाली जातील, असाही एक अंदाज आहे. त्यात भारतातील कोलकाता आणि मुंबईचा समावेश आहे. कदाचित जोडलेली मुंबई पुन्हा एकदा सात बेटांची पूर्ववत होऊ शकेल..

मुंबईचा, माझ्या शहराचा पाऊस मनावर ठसला तो अगदी लहानपणी. आमच्या जिन्याखालच्या आडोशाच्या खोलीत आईच्या कुशीत बिलगून असताना चाळीच्या छपरावर तडतड वाजणारा तो पाऊस.. नंतर तो कित्येकदा मित्र बनून भेटला.. हॉर्निमन सर्कलच्या बागेत गंगुबाई हनगल यांच्या तानांसह विजेचा कडकडाट करत माना डोलावणारा तो पाऊस.. त्याची विलोभनीय रुपे तरी किती.. आज अठराव्या मजल्यावरच्या माझ्या प्रशस्त घराच्या गॅलरीच्या छपरावरही तो तसाच तडतडतो.. तो अगदी तसाच आहे.. पूर्वीसारखाच. बदललो आहे तो मी. बदलले आहोत ते आम्ही मुंबईकर. कधीकधी तो घनघोर पडतच रहातो.. या शहराची कहाणी आणि कित्येक आठवणी अनेकांच्या मनांत जागवत !

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४३ वी गोष्ट.)

 

- रवींद्र शांताराम पांचाळ

[email protected]

(भवताल मासिकाच्या जून २०२१ अंकातून...)

 

फोटो सौजन्य =

1. KVParameshwar,Wikimedia.org

2. Ronie, Pixahive.com

3. Thomas Hawk, flickr.com

4. indianfilmseveryday.wordpress.com

5. Ganesh Kore

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४३ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

4 Comments

M N Damle

अतिशय सुंदर वर्णन .आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या आठवणी ताज्या करणारा लेख.

Bhavatal Reply

खरंय... सर्वांनाच जुन्या काळात नेणारा लेख. धन्यवाद.

Ganesh wadajkar

पाऊसाळा म्हणजे काय... आणि त्या काळी...वाहणार पाणी... आणि लगेच... पाणी कसं...जमिनीत झिरपायच... एक अलौकिक कोडं...पण आज.. पाणी कधी आलंच तर... सगळीकडे..पाणीच पाणी...मग जिवघेण्या प्रसंग उद्भवतात... अनेक मनुष्य हाणी... यांचं कारण.. काँक्रीटचे जंगल...भोतिक सुविधा उपलब्ध झाल्याने... नैसर्गिक जिवनमान उध्वस्त झालं... यांचं उदाहरण खूप छान लेख... सरांनी मांडले... खरंच... आपलं मनापासून अभिनंदन... खूप छान लिहीलात...🌷🌳🌳🙏🙏 धन्यवाद

Bhavatal Reply

अगदी खरंय. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

Amit C Rege

अतिशय सुंदर वर्णन. असेच लेख आम्हाला वाचायला मिळो.

Bhavatal Reply

होय, नक्कीच. आभार 🙏

चंद्रकांत रा. साटम.

खुप सुंदर वर्णन सरांनी येथे केलय. जुने पावसाळी दिवस आठवले. माझं बालपण ग्रॅन्टरोडला चाळीत गेलयं. मुसळधार पाऊस पडला, आणि त्याला समुद्राच्या भरतीची साथ लाभली की आमच्या चाळीचा तळमजला पाण्याखाली गेलेला असायचा. मग तळमजल्यावरील बिर्‍हाडं एका रात्रीसाठी म्हणून पहिल्यामाळ्यावर येत. पहिल्या माळ्यावरील बिर्‍हाडं त्यांची सर्व व्यवस्था करीत. हे तुंबलेलं पाणी १२-१२,२४-२४ तास उतरत नसे. या सर्व आठवणी उजागर झाल्या. असो. कालाय तस्मै नमः. मात्र पाऊस असाच सदैव बेभरवशाचा असावा असचं वाटतं, कारण त्यात थ्रिल आहे. त्याची उत्सुकतेनं वाट पहाणं हा एक वेगळाच आनंद आहे आणि या उत्सुकतेनंतर त्याचं ते कोळसणं एक आनंददायी अनुभव असतो एव्हढं निश्चित.

Bhavatal Reply

लेख सुंदरच आहे. तुमच्याही आठवणी तो काळ जागवणाऱ्या आहेत. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.,

Your Comment

Required fields are marked *

You may also like